पैठण, (प्रतिनिधी): पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बुधवारी नगरपरिषदेच्या नूतन सक्शन व जेटिंग मशीन वाहनाचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण सोहळा उत्साहात झाला.
या अत्याधुनिक वाहनामुळे पैठण शहरातील पाईपलाईन, गटारी व अंडरग्राउंड ड्रेनेज व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मोठी मदत होणार आहे. पाईपलाईनमध्ये निर्माण झालेले चोकअप, गाळ व इतर अडथळे दूर करण्यासाठी या मशीनचा प्रभावीपणे उपयोग करता येणार आहे.
जेटिंग मशीनची वैशिष्ट्ये :
उच्च दाबाच्या वॉटर प्रेशरद्वारे ड्रेनेज व पाईपलाईनमधील चोकअप काढता येणार, साधारण १५० ते २०० फूट अंतरापर्यंतचे कठीण चोकअप दूर करण्यास मदत होणार. पावसाचे पाणी, नळाचे पाणी किंवा नालीचे पाणी साचलेल्या ठिकाणी ते बाहेर काढण्यासाठी उपयोगी, सेप्टिक टैंक, सेफ्टी टँकची सफाई करण्यासाठी सक्शन
यंत्रणेचा उपयोग करता येणार, गटारी व अंडरग्राउंड ड्रेनेजची स्वच्छता अधिक जलद व प्रभावीपणे करता येणार,
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने स्वच्छता व पाणी निचरा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त, या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे नगरपरिषदेच्या स्वच्छता यंत्रणेला बळकटी मिळून पैठण शहरातील नागरिकांना अधिक जलद, सुरक्षित व प्रभावी सेवा उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा विद्या भुषण कावसानकर, उपनगरध्यक्ष तुषार पाटील सर्वनगरसेवक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. स्वच्छता, सुविधा आणि सक्षम नागरी व्यवस्थेच्या दिशेने पैठण नगरपरिषदेचे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.















